दिवाळी आणि आयुर्वेद

Diwali And Ayurved

Diwali And Ayurved

दिवाळी हा भारतभरातील महत्त्वाचा सण. दिवाळीतील प्रत्येक दिवसाला काही संदर्भ आहेत. त्यातील अनेक प्रथा, परंपरांच्यामागे आयुर्वेदातील अनेक शास्त्रीय संकल्पना आहेत. त्या समजून घेऊया !

कार्तिक महिना म्हणजे शरदाचा उत्तरार्ध, हळूहळू हवेमध्ये कोरडेपणा वाढू लागतो. अश्विनाच्या सुरुवातीला हैराण करणारा उन्हाचा कडाका थोड़ा कमी होऊन, सकाळी व रात्री हवेमध्ये गारवा यायला सुरुवात होते. दिवस लहान आणि रात्री मोठ्या, असे एकूण सर्व वातावरण असते. कार्तिकाच्या सुरुवातीला येणाऱ्या दिवाळी या सणामध्ये असणाऱ्या अनेक प्रथा, परंपरांच्यामागे, आयुर्वेदातील अनेक शास्त्रीय संकल्पना आहेत असे दिसते.

दिवाळीला सगळ्यात महत्त्वाचा सोपस्कार म्हणजे अभ्यंगस्नान नरकचतुर्दशीच्या दिवशी ही प्रथा पाळली जाते. या सुमारास हवेमध्ये हळूहळू कोरडेपणा वाढत चाललेला असतो, त्यामुळे त्वचा कोरडी होते. त्वचेची ही रुक्षता वेळीच आटोक्यात ठेवण्यासाठी, स्निग्ध गुणाचे तेल सर्व अंगाला जिरवणे म्हणजे अभ्यंग करणे. अभ्यंगस्नान फक्त दिवाळीच्या दिवशी करायचे नसून, त्यानंतर पूर्ण हेमंत आणि शिशिर ऋतूपर्यंत म्हणजे जवळजवळ होळीपर्यंत, रोज किंवा आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा करायचे आहे. त्यामुळे आपल्याला अनेक फायदे मिळतात. नित्य अभ्यंग केल्यामुळे तारुण्य टिकून राहते, त्वचा तजेलदार राहते, शरीर बांधेसूद राहते, आयुष्य वाढते, दृष्टी सुधारते आणि हो मुख्य म्हणजे मन अतिशय प्रसन्न राहते.

अभ्यंग केल्यानंतर साबण न वापरता, सुगंधी उटणे किंवा मसूर डाळीचे पीठ अंगाला चांगले चोळून लावावे, त्यालाच आयुर्वेदाच्या भाषेत उद्वर्तन असे म्हटले जाते, मगचं आंघोळ करायची आहे. उद्वर्तनामुळे शरीराची रोमरंध्र स्वच्छ होऊन, रक्तप्रवाहण सुधारते, त्वचा नितळ होते, अंगावरील फाजील चरबी कमी होते आणि अग्नि चांगलाच प्रज्वलित होतो. जे खाऊ ते पचते व अंगी लागते.

या महिन्यातली आणखी एक प्रथा आहे, ती म्हणजे कार्तिकस्नान, आश्विन पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा, असे महिनाभर रोज पहाटे उठून स्नान करणे. रात्र मोठी असल्यामुळे झोप जास्त होते आणि पहाटे गारवा असल्यामुळे पांघरूणात गुरफटून झोपावेसे वाटते. पण उशीरापर्यंत झोपल्याने थंडी तर पळत नाहीच, पण उलट आळसावलेपणाच जास्त येतो, म्हणून पहाटे पहाटे स्नान केल्याने थंडी वाजण्याची बंद होते, शरीर आणि मन प्रसन्न होऊन दिवसभराच्या कामाचा उत्साह वाढतो.

दिवाळीच्या सुमारास, साधारणपणे खरीपाची पीके निघालेली असतात. घरे धनधान्याने भरलेली असतात. गळीताची धान्येही निघालेली असतात व त्याचे ताजे तेल काढलेले असते. वर्षा ऋतूत मंदावलेली भूक आणि पचनशक्ती आता वाढीला लागलेली असते. अशा अनुकूल काळात, निसर्गाचे देणे साजरे करण्यसाठी, घरात असणारी वेगवेगळी धान्ये एकत्र करून, त्याची भाजणी करून त्याच्या चकल्या कडबोळी करून तसेच करंज्या, शंकरपाळे, लाडू, अनारसे अशी मिष्टान्ने बनवून, सर्वांनी मिळून एकत्र त्याचा आस्वाद घेणे, ही दिवाळीच्या फराळामागची खरी संकल्पना या फराळाच्या पदार्थांमध्ये मैदा, वनस्पती तूप, साखर या गोष्टींचा वापर टाळता आला तर फारच उत्तम. त्याऐवजी कणीक, गूळ, साजूक तूप, तिळाचे तेल वापरले तर, हाच फराळ अधिक पौष्टिक आणि आरोग्यदायी होईल सध्या चिवडा, चकली, शेव, लाडू इत्यादी वस्तू बाराही महिने आपल्या घरामध्ये असतात, त्यामुळे दिवाळीत त्याचे विशेष अप्रूप वाटेनासं झालंय हेही खरचं आपण हे सर्व पदार्थ कधीही बनवू. आणू शकतो, पण ते पचवण्यासाठी लागणारी पचन शक्ती मात्र याच कालावधीत असते हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे बारा महिने दिवाळी साजरी करणे, जरी आपल्या खिशाला एखादवेळ परवडले, तरी आपल्या आरोग्याचे मात्र दिवाळे काढणारे ठरते हे निश्चित.

अशा तऱ्हेने दिवाळीच नाही, तर प्रत्येक भारतीय सण हा आपल्यासाठी आनंद आणि आरोग्य अशी दुहेरी भेट घेऊन येतो. गरज आहे या सगळ्याकडे डोळस दृष्टीकोनातून बघण्याची!

  • वैद्य उर्मिला पिटकर, मुंबई, एम् डी. पीएच् डी. (आयुर्वेद) यांचे लेखातून साभार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Book Your Appointment

For Appointment fill in the form below or call us.


    ×

    Hello!

    Click below to chat on WhatsApp

    × How can I help you?