डॉक्टर, थंडी पडली, आभाळ आले की माझे सांधे दुखतात, काय करु ?
आयुर्वेद उवाच : शरीरामध्ये होणार्या कोणत्याही प्रकारच्या वेदना या दुष्ट झालेल्या वातामुळे किंवा दुष्ट रक्तामुळे होतात्. शरीरात वेदना उत्पन्न करण्याचा धर्म वातामध्ये अधिक असतो. ( वेदना वातात् ऋते नास्ति ।) वात हा आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा घटक असून त्याचे आपल्या शरीरातील सूक्ष्मातिसूक्ष्म हालचालींपासून ते आपण चालतो, बोलतो, धावतो या सर्व हालचालींवर नियंत्रण असते.वातावरण किंवा आहार विहार यामुळे शरीरात रुक्षता व शीतता वाढली की या वाताची वृद्धी होते. कारण रुक्ष आणि शीत हे वाताचे प्रमुख गुण आहेत. अशाप्रकारे कुपित झालेला वात जेव्हा सांधे, मांसपेशी, मणके याठिकाणी स्थानसंश्रय करतो (आश्रय घेतो ) त्यावेळी सांधेदुखी, हातपायाच्या शिरा आखडणे, हातापायांमध्ये टोचल्याप्रमाणे वेदना होणे, हात पाय किंवा शरीरातील एखाद्या ठिकाणी सुंधपणा जाणवने अशी निरनिराळी लक्षणे दिसू लागतात. या लक्षणासोबत पोट साफ़ न होणे, पोटात गॅसेस होणे अशी लक्षणेही दिसतात. कारण, वाताची निर्मिती अन्नपचनच्या शेवट्च्या भागात म्हणजे मोठ्या आतड्यात जेथे मलाची निर्मिती होते तेथेच होते. या वातावरण व आहार विहारामुळे वाढलेल्या वातावर नियंत्रण मिळवण्यासाठी वाताच्या रुक्ष आणि शीत या गुणांच्या विरुद्ध स्निग्ध, उष्ण अशी चिकित्सा जसे शरीराला तेल लावणे ( स्नेहन ), वाफ़ देणे (स्वेदन) उपयुक्त ठरते. स्निग्ध, उष्ण असा आहार आणि पंचकर्मातील बस्ति या चिकित्सेचादेखील उत्तम उपयोग होतो. त्यासोबत काही वातशामक औषधी आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.