आपण सध्या बघतो पैसा, काम, संसार, टेन्शन, जबाबदारी व संघर्षमय व धावपळीचे झाले आहे. प्रत्येक मनुष्य सध्या तणावग्रस्त जीवन व त्यामुळे व्याधीग्रस्त झालेले शरीर घेवून जीवन संघर्ष करीत असलेला दिसतो. अशा स्पर्धात्मक युगात Hurry (धावपळ), Curry (मसालेयुक्त आहार ), Worry (चिंता) प्रत्येक व्यक्तीमध्ये अम्लपित्त (Acidity) निर्माण करत असल्याचे दिसून येते. त्यासाठी अनेक प्रकारची Antacids घेवून फ़रक पडत नाही. पुढे एन्डोस्कोपी व अन्य तपासण्या चालू राहतात. तेव्हा पर्यायी उपचार पद्धती म्हणून लोक आयुर्वेदाकडे येतात.
आयुर्वेदामध्ये अम्लपित्तासाठी अतिशय परिणामकारक औषधी व विरेचनासारखे दीर्घकाळ उपशय देणारे उपचार सांगितलेले आहेत. अम्लपित्त होण्यासाठी मुख्य कारण असते ते म्हणजे अनियमित आहार- विहार म्हणून निदान परिवर्जन करण्यासाठी आपल्या जीवनशैलीमध्ये काही बदल करणे गरजेचे असते. सकाळी लवकर उठावे. सकाळी १ कप दूधात १ चमचा साजूक तूप टाकून घेणे. सकाळी भाजी पोळीचा नाष्टा व दुपारी १२ वा. जेवण, पुन्हा सायंकाळी ७ च्या आत जेवण घेणे व रात्री लवकर झोपणे. झोपण्यापूर्वी शक्य झाल्यास दुध तूप घेणे. आहारातून अतितिखट, आंबट, तळलेले, खारट पदार्थ, दही, लिंबू, लोणची, काळा मसाला, हरभरा, तूरडाळ, बाजरी, अतिप्रमाणात चहा घेणॆ वर्ज्य केल्यास कुठल्याही औषधाविना रुग्णास उपशय मिळतो. मात्र काही व्यक्तिंमध्ये कारण नसताना चिंता / टेन्शन घेणे हे देखील मुख्य कारण असते. अशा व्यक्तिंनी ’निर्लज्जम् सदासुखी’ या मंत्राचे अनुकरण करणे म्हणजे चिंताविरहित राहणे फ़ायदेशीर ठरते अम्लपित्त असलेले अनेक लोक रोज सकाळी पाणी पिऊन उलटी करतात. पण हि चुकिची पद्धत आहे. कारण पित्ताची शुद्धी विरेचनानेच ( जुलाबाद्वारे) झाली पाहिजे. अन्यथा रोजच्या उलटीमुळे व अम्लपित्तामुळे अन्ननलिकेस इजा होऊ शकते. १५ दिवसातून एकदा जुलाब – विरेचन घेतले तरी दीर्घकाळ त्याचा फ़ायदा झालेला दिसून येतो. त्यासाठी आयुर्वेदिक वैद्याचे मार्गदर्शन उपयुक्त. शास्त्रोक्त पद्धतीने विरेचन नावाचे पंचकर्म करुन घेतल्यास अशुद्ध् पित्ताची मोठ्या मात्रेने शुद्धी होते म्हणून अम्लपित्तासाठी विरेचन घेणे श्रेयस्कर.