सोरियासिस (Psoriasis), दाद (Fungal Infection), इसब (Eczema) ,पांढरा कोड (Leucoderma), अंगावर पित्त उठणे (Urticaria) यासारखे अनेक प्रकारचे त्वचारोग हल्ली व्यवहारात पाहायला मिळतात. आयुर्वेदानुसार त्वचाविकार हे मुख्यत: रक्तदुष्टीमुळे होतात. रक्तदुष्टी होण्यामागे अनियमित आहार- विहार, आंबट, खारट, तिखट, विदाही, शिळे अन्नसेवन, रात्री जागरण करणे, दिवसा जेवून लगेच झोपणे ही पित्त बिघडवणारी कारणे जबाबदार असतात. कारण आपल्या शरीरात पित्त हे रक्ताच्या आश्रयाने राहाते. अशाप्रकारे दुष्ट झालेले रक्त, पित्त, क्लेद हे त्वचेमध्ये जावून खाज येणे, त्वचेचा रंग बदलणे, त्वचेवर जखमा होणे, पू येणे, पाणी येणे अशी निरनिराळी लक्षणे वात, पित्त, कफ़ यांच्या अधिक्यानुसार निरनिराळी लक्षणे निर्माण करतात. त्वचाविकारांत प्रामुख्याने पित्त व रक्त यांची दुष्टी आढळून येत असल्याने त्वचेच्या आजारात विरेचन व रक्तमोक्षण हे पंचकर्मातील उपचार त्वचाविकारांचा नाश करणारे, आरोग्य, आयुष्य संवर्धित करणारे ठरतात. याचसोबत विविध आयुर्वेदिक लेप सुद्धा उपयोगी ठरतात.