विरेचन म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीने करविलेला जुलाब होय. शरीरात वाढलेला पित्त दोष जुलाबाद्वारे शरीराच्या अधोमार्गाने बाहेर काढून टाकणे म्हणजे विरेचन (Laxation) होय. विरेचन हे लहानांपासून वृद्धांपर्य़ंत ऋतुनुसार शारीरिक बलानुसार, अवस्थेनुसार व आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्यानुसार घेता येऊ शकते. शास्त्रोक्त पद्धतीने विरेचन करण्यासाठी विरेचनापूर्वी वर्धमान मात्रेत म्हणजे वाढत्या मात्रेत औषधानी सिद्ध केलेले तूप (घृतपान ) घेण्यास सांगितले आहे. म्हणजे त्यामुळे जठर, आतड्यांना स्नेहनाचे ( मालीश – Lubrication ) कार्य होऊन विरेचनाच्या औषधाने शरीरातील दोष विनासायास बाहेर निघून जाण्यास मदत होते. हे आभ्यंतर स्नेहन ३ दिवस, ५ दिवस अथवा ७ दिवस रुग्णाच्या कोठ्यानुसार – पचनशक्तिनुसार केले जाते. अशा पद्धतीने शरीर आतून स्निग्ध झाल्यानंतर २-३ दिवस शरीराला बाहेरुन स्निग्ध करण्यासाठी मालीश वाफ़ ( स्नेहन स्वेदन ) केली जाते. त्यानंतर रुग्णाच्या आजारानुसार, प्रकृतीचा, बलाचा, ऋतुचा विचार करुन विरेचनाचे औषध दिले जाते. विरेचनामुळे जुलाब होत असले तरी यामध्ये शरीर जुलाबासाठी तयार करुन त्यानंतर जुलाब करविले जातात. त्यामुळे शरीरात जुलाबानंतर (विरेचनानंतर) थकवा न येता शरीर हलके होते.