अनियमित आहार-विहार, सततचा प्रवास, टेन्शन यामुळे पित्ताप्रमाणेच वातदोषाचाही प्रकोप होत असल्याने वातदुष्टीचे संधिवात, कंबरदुखी, डोकेदुखी, लकवा (Paralysis) असे पेशंट दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येते. संधिवातने ग्रस्त असलेले रुग्ण फ़रक पडत नाही म्हणून सतत डॉक्टर बदलत राहतात व अखेर सतत आजाराच्या चिंतेने ग्रस्त असतात. संधिवाताने ग्रस्त असलेले रुग्ण पोट साफ़ असले की बरे वाटते, वेदना कमी वाटतात असे म्हणताना दिसतात. वाताची निर्मिती अन्नपचनच्या शेवट्च्या भागात म्हणजे मोठ्या आतड्यात जेथे मलाची निर्मिती होते तेथेच होते. अपचनातून तयार होणारा वात खराब तयार होतो आणि हा दुष्ट झालेला वात सांधे, मांसपेशी, मणके याठिकाणी स्थानसंश्रय करतो (आश्रय घेतो ) त्यावेळी सांधेदुखी, हातपायाच्या शिरा आखडणे, हातापायांमध्ये टोचल्याप्रमाणे वेदना होणे, हात पाय किंवा शरीरातील एखाद्या ठिकाणी सुंधपणा जाणवने अशी निरनिराळी लक्षणे दिसू लागतात. अपचनातून तयार झालेला खराब वात हा वातविकाराचे प्रमुख कारण असतो. त्यासाठी बद्धकोष्ठता हे एक प्रमुख कारण सांगितलेले आहे. म्हणून त्यावरची मुख्य चिकित्सा ’बस्ति’ सांगितली आहे. त्याबरोबर मृदुविरेचन हे देखील सांगितले आहे. (स्नेह: स्वेद: संशोधनं मृदु ।)